आवाज महाराष्ट्राचा LIVE
मुख्य संपादक – जब्बार पिरजादे
वाळवा : रमजान ईदची खरेदी करून घरी परतताना दुचाकी व डंपरची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील दोन मुलासह तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर महिला गंभीर रित्या जखमी झाली आहे.
काल बुधवार दि.२६ मार्च रोजी दुपारी साडेचार वाजणेच्या सुमारास आष्टा ते इस्लामपूर मार्गावर हा अपघात घडला असून अपघातानंतर डंपर चालकाने डंपर जागेवर सोडून पलायन केले आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कुंडलवाडी येथील अश्फाक शब्बीर पटेल हे पत्नी हसीना मुलगा अश्रफ व असद यांना दुचाकी गाडी क्रमांक MH 10 BD 2819 वरून मिरज येथे रमजान ईदचे साहित्य तसेच मुलांना कपडे खरेदी करण्यासाठी गेले होते.
ईदची खरेदी झाल्यानंतर आष्टा मार्गे कुंडलवाडीला जात असताना घरी पोहोचण्याआधीच पटेल कुटुंबीयांवर काळाने घाला घातला.
आष्टा ते इस्लामपूर मार्गावर शिंदे मळ्यानजीक हॉटेल नंदनवन जवळ आल्यानंतर इस्लामपूर कडून आष्ट्याकडे खडी घेऊन येणाऱ्या डंपर क्रमांक MH 10 DT 0468 याची व दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक होऊन डंपरच्या उजव्या बाजूला पुढील चाकाखाली आल्याने दुचाकी वरील अशपाक शब्बीर पटेल यांच्यासह दोन मुले व पत्नी दुचाकीवरून उडून डंपरला धडकून रस्त्यावर पडल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने यामध्ये अशपाक पटेल यांच्यासह दोन्ही मुले जागीच ठार झाली तर पत्नी हसीना अशपाक पटेल या गंभीर जखमी झाल्या.
अपघातात मृत झालेली मुले अश्रफ हा सातवीत तर असद पाचवीच्या वर्गात शिकत होता.
पटेल कुटुंबियानी रमजान महिन्याचे रोजे केले होते.
रमजान ईद सोमवारी साजरी होणार असून याची तयारी करण्यासाठी सहकुटुंब पटेल आष्टा येथे बाजारासाठी गेले होते. एकाच वाहनावरून दोन मुले व पत्नी यांना घेऊन त्यांनी बाजारही केला.
ईद दिवशी शीरखुर्मा (खीर) करण्यासाठी लागणारे काजू, बदाम,शेवया व अन्य साहित्य खरेदी करून मुलांना कपडेही खरेदी केली होती. मात्र, घरी पोहचण्या आधीच त्यांच्यावर काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
अपघाताची माहिती समजताच तात्काळ आष्टा पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी महिलेला उपचारासाठी तातडीने इस्लामपूरच्या रूग्णालयात दाखल केले असून महिलेची प्रकृती चिंताजनक आहे.
रमजानच्या पवित्र महिन्यात पटेल कुटुंबीयांवर काळाने घाला घातल्याने कुंडलवाडी गावावर शोककळा पसरली आहे.








