खानापूर (सांगली) / जब्बार पिरजादे
खानापूर : खानापूर शहरातील नागरिकांकडून घरपट्टी, पाणीपट्टी करांची खानापूर नगरपंचायतीला देय असलेली लाखो रुपयांची रक्कम थकीत असल्याने नगरपंचायत प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे, थकीत कराच्या वसुलीसाठी खानापूर नगरपंचायतीकडून धडक मोहीम राबवण्यात येत आहे, कर न भरणाऱ्या नागरिकांची नळ कनेक्शन तोडणी व दंडात्मक कारवाई केली जात आहे. आतापर्यंत सुमारे ४९ नळ कनेक्शन तोडण्यात आली आहेत
खानापूर नगरपंचायतीने थकीत करधारकांचे डिजिटल करून गावातील मुख्य चौकात लावले आहेत, कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी तातडीने कराची रक्कम नगरपंचायतीत अथवा वसुली कर्मचाऱ्यांकडे भरून सहकार्य करावे, असे आवाहन खानापूर नगरपंचायत प्रशासनाकडून करण्यात आले आहे
खानापूर शहराला दैनंदिन पाणीपुरवठा करणे, पाणीपुरवठा योजनेची दुरुस्ती व देखभाल करणे,वीजबिल भरणे, कर्मचाऱ्यांचा पगार करणे, गावातील स्वच्छता, किरकोळ रस्ते दुरुस्ती, गटार दुरुस्ती, रस्त्यावरील दिवाबत्तीची सोय करणे, कार्यालयीन खर्च यासारखी अनेक नित्याची कामे नगरपंचायतीला करावी लागतात, ही कामे करण्यासाठी नगरपंचायतीला उत्पन्न मिळणे आवश्यक असते, घरपट्टी आणि पाणीपट्टी यातून जमा होणाऱ्या निधीतून वरील व इतर आवश्यक कामे नगरपंचायतीस करणे शक्य होते, त्यामुळे प्रत्येक मालमत्ताधारकांनी आपला विविध करांचा भरणा त्या, त्या आर्थिक वर्षात करणे आवश्यक आहे.
खानापूर शहरात विविध प्रभागातून रस्ते, गटर यासह विविध विकास कामे झाली आहेत तर मुख्य बाजार पेठेत सध्या गटरचे काम सुरू आहे, काही कामे प्रस्तावित असून ती मार्गी लावण्यासाठी शहराचा कर वसूल होणे तितकेच महत्त्वाचे आहे
खानापूर नगरपंचायतीने डिसेंबर महिन्यापासून घंटागाडीवर स्पीकर बसवून नागरिकांना कर भरण्याची सूचना केली होती
त्या अनुषंगाने काही मिळकत धारकांनी आपली कराची रक्कम भरलेली आहे, मात्र अद्यापही काही मिळकत धारक कर भरण्यास टाळाटाळ करत आहेत, त्यांच्या वसुलीसाठी पथके तयार करण्यात आली असून ही पथके मिळकत धारकांच्या घरोघरी जाऊन कराची मागणी करत आहेत, काही मिळकतधारक आज भरतो, उद्या भरतो असे सांगून जाणीवपूर्वक कर भरण्यास टाळाटाळ करत आहेत.
नागरिकांनी सहकार्य करण्याचे खानापूर नगरपंचायतीचे आवाहन,
कर वसुलीसाठी खानापूर शहरात पथके तयार केली असून त्यांच्याद्वारे वसुलीची मोहीम सुरू आहे, काही छोटे – मोठे थकबाकीदार देखील आहेत त्यांच्याकडून प्राधान्याने वसुली सुरू आहे, सुट्टीच्या दिवशीही पथके वसुली करीत आहेत, कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी कर भरून खानापूर नगरपंचायतीला सहकार्य करावे.
सोनाली यादव
मुख्याधिकारी खानापूर नगरपंचायत, खानापूर.








