आवाज महाराष्ट्राचा.LIVE
मुख्य संपादक – जब्बार पिरजादे
खानापूर / सांगली : खानापूर तालुक्यातील बलवडी (खा) येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या घरफोडीचा छडा खानापूर पोलिसांनी अवघ्या काही तासांत लावला. या प्रकरणी पोलिसांनी दोघा संशयितांना अटक करून त्यांच्या कडून तब्बल ८ लाख ६६ हजार ८२१ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि.१५ ऑगस्ट) रोजी दुपारी २ ते ४ वाजण्याच्या सुमारास बलवडी (खा) येथे घरफोडीची घटना घडली होती. अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम असा मुद्देमाल लंपास केला होता.
विटा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच खानापूर पोलिसांनी जलदगतीने तपास सुरू केला. विट्याचे पोलिस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक विशाल येळेकर यांच्या खानापूर पोलीस दुरक्षेत्रच्या पथकाने संशयितांचा शोध घेऊन अल्पावधीतच आरोपींना ताब्यात घेतले त्यामध्ये अटक करण्यात आलेले शहाजी नंदकुमार मंडले (वय ३१,अग्रणी मळा, खानापूर) आणि नितीन मल्हारी ठोंबरे (वय ३०, चोपडेवाडी, खानापूर) असे आरोपींची नावे असून त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

या कारवाईत विट्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक विशाल येळेकर यांच्या पथकातील आण्णासो भोसले,रमेश चव्हाण, सुहास चव्हाण,सुरेश पाटील,महादेव चव्हाण,जयकर ठोंबरे,प्रशांत जाधव अमोल नलवडे, शशिकांत झांबरे, शिवाजी हुबाले यांनी सहभाग घेतला होता.
पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विशाल येळेकर हे करीत असून खानापूर पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे स्थानिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.









